मुंबई : सध्या जगभरात परसलेल्या कोरोना विषाणूला चीनच्या साथीनं डब्ल्यूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनही तितकच जबाबदार आहे, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंग यांनी संयुक्त राष्ट्राकडे एक पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रातून त्यांनी चीनसह डब्ल्यूएचओच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 23 जानेवारीला जेव्हा कोरोनासंदर्भात पहिली जागतिक स्तरावरील बैठक पार पडली तेव्हाच डब्ल्यूएचओनं कठोर पावलं उचलायला हवी होती. मात्र त्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं निभावली नाही, असा आरोप करत सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या हाहा:काराची सारी जबाबदारी घेत डब्ल्यूएचओच्या अध्यक्षांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही आभा सिंग यांनी या पत्राद्वारे युएनकडे केली आहे.
चीननं जगभरातील लोकांचा निरोगी आयुष्य जगण्याच्या मुलभूत अधिकारावरच घाला घातला आहे. त्यामुळे चीनवर कठोर कारवाई व्हायला हवी. चीनमधून एखादा विषाणू जगभरात परसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही सार्स, बर्ल्ड फ्लू यासांरखे विषाणूजन्य आजार चीनमुळे जगभरात परसले आहेत. चीननं वारंवार डब्ल्यूएचओचे नियम पायदळी तुडवले आहेत. आपल्या देशात कोरोनामुळे सुरू झालेली महामारी चीननं जगापासून तसेच डब्ल्यूएचओपासून लपवून ठेवली. नियमानुसार त्यांनी 24 तासांत डब्ल्यूएचओला याची माहिती देणं बंधनकारक होतं. त्यामुळे कोरोनामुळे सध्या जगभरात जी महामारी पसरलीय त्यासाठी चीननं जगाची माफी मागावी असे निर्देश युएननं जारी करावेत अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे. खरतरं गेल्या वर्षीच्या ख्रिसमस पासूनचं कोरोनानं जगभरात आपला फैलाव सुरू केला होता. त्यामुळे डब्ल्यूएचओनं कोविड 19 ही वैश्विक महामारी आहे हे जाहीर करायला मार्च उजाडायची वाट का पाहिली?, असा सवालही आभा सिंग यांनी विचारत डब्ल्यूएचओ आणि चीनचे काही लागेबंध तर नाहीत ना? याबाबतही संयुक्त राष्ट्रांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
आज जगभरातील सुमारे 200 देश कोरोनाच्या विळख्यात आहेत. या भयंकर रोगामुळे लाखो लोकांचे बळी गेलेत, जगभरातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलीय. त्यामुळे जगानं चीनवर आर्थिक निर्बंध लादून ही नुकसान भरपाई वसूल करावी अशीही मागणी आभा सिंग यांनी आपल्या पत्रातून केली आहे. या पत्राला संयुक्त राष्ट्रानं उत्तर देताना म्हटलं की, तक्रारदारानं यासंदर्भात आपल्या देशातील यंत्रेणेमार्फत तक्रार दाखल करावी. जेणेकरून देशपातळीवरून संयुक्त राष्ट्रापुढे रितसर हा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करता येईल. संयुक्त राष्ट्राकडनं आलेल्या या उत्तरानंतर आभा सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही साकडं घातलंय की, एक जागतिक नेता या नात्यानं त्यांनी चीनविरोधात कठोर भूमिका घ्यावी. भारतानं चीनसोबत असलेले आपले व्यवहार बंद करून चीनी वस्तूंवरदेखील बहिष्कार घालावा अशी भावनाही आभा सिंग यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
Lockdown Rules | लॉकडाऊन मोडल्यास इतर देशात काय शिक्षा?