फिरोजपूर झिरका (हरियाणा) : तब्लिगी जमातच्या बारा यात्रेकरुंना पास देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातल्या फिरोजपूर झिरका इथले पंचायत समितीचे माजी सभापती फकरुद्दीन यांनी मदत केली होती. विशेष म्हणजे या 12 जणांना पास देणारे नायब तहसीलदार यांनीच ही तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता पुढील तपास करत
काय आहे प्रकरण?
हरियाणातील फिरोजपूर झिरकामधून आंध्रप्रदेशातील करनुल जिल्ह्यात जाण्यासाठी तब्लिगी जमातच्या बारा यात्रेकरुंनी पास मिळवून प्रवास केला. यामधील आठ जण कोरोनाबाधित होते. मात्र लॉकडाऊन असतानाही हा पास कसा देण्यात आला यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली. शासकीय पातळीवर व्यवहार सुरु झाले. या बारा जणांना फिरोजपूर इथल्या पंचायत समितीचे माजी सभापती फक्रोउद्दीन यांनी मदत केली होती. हे बारा जण माझे नातलग आहेत. त्यापैकी एकाची पत्नी आजारी आहे असा बनाव रचला आणि तहसीलदारांकडून पास मिळवला. "परंतु या पासचा वापर धार्मिक प्रवासासाठी करण्यात आला. तसंच विविध ठिकाणांच्या प्रवास लपवण्यात आला. त्यामुळे माझी फसवणूक करुन पास बनवून घेतला," अशी तक्रार फिरोजपूर झिरकाच्या तहसीलदारांनी केली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल; पालकमंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
यात्रेकरु हरियाणातून निलंग्यात
गेल्या तीन महिन्यांपासून हे 12 यात्रेकरु धार्मिक कार्यासाठी हरियाणाच्या नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका इथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते लातूरच्या निलंग्यात पोहोचले. लॉकडाऊनच्या काळात 2 एप्रिलच्या मध्यरात्री निलंग्यातील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले. त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यांच्यावर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आठपैकी तिघे कोरोना निगेटिव्ह
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठपैकी तिघांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याचबरोबर या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित पाच पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्टही लवकरच निगेटिव्ह येतील आणि लातूरचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर येईल, असा आशावाद वैद्यकीय उपाचर करणाऱ्या पथकाने व्यक्त केला आहे.