Dilip Walse-Patil on Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही म्हटलंय. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवल्याचं स्पष्टीकरणही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई कोणी केली? याबाबत अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसत आहे. 


दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, याबात जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयानं घेतला. ही वस्तूस्थिती आहे. या कारवाईबाबत शरद पवारांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. काल जी परिस्थिती कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. ती त्यांनी गृहविभागाला कळवली. त्यानंतर दोन्ही पक्ष समोरा-समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली."


कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको; हसन मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा टोला


कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, असं म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले त्यावर मुश्रीफांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले पाटलांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोलात की, कारखान्यात 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत, त्या कंपन्या कुठे आहेत? त्या कंपन्यांनी सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी गुंतवणूक केली, यावर बोला ना, यावर बोलतच नाही. यावेळी मला मुश्रीफांना एक आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्यानं काम करायचं असतं." 


किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ


मुश्रीफ म्हणाले की, "किरीट सोमय्या सातत्यानं सांगतात की, मी ही कागदं काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसंच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थानं लढावं, असं कुणाचातरी वापर करुन बदनामी करुन, माझ्या कुटुंबियांची बदनामी करुन त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत. मागेही मी या आरोपांचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. त्यांच्या या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का? असा प्रश्न पडतोय. मला त्यांना सांगायचंय की, मी तुमच्याकडे एकदा सीए पाठवतो आणि जे दोन माझ्यावर आरोप केलेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :