Devendra Fadnavis on Hasan Mushrif : किरीट सोमय्या सातत्यानं महाविकासआघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी हसन मुश्रीफांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तसेच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर राज्याचं राजकारण चांगंलच ढवळून निघालं आहे. अशातच आता यावरुन आरोप-प्रत्यारोपांचा फैरी रंगल्याचं दिसून येत आहे. सकाळपासून राज्यात पत्रकार परिषदांचं सत्र सुरु आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेनं या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवसेनेच्या सुत्रांचं असंही म्हणणं होतं की, मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण कारवाईची काहीही कल्पना नव्हती. याच सर्व घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, नसेल माहिती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची, असा उपरोधिक टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले की, मला असं वाटतं की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितलं जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात, अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं असू शकतं की, मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल. ही कारवाई थेट गृहमंत्र्यांनी केली असेल. पण माझं मत असं आहे की, मुख्यमंत्र्यांना कळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे."
हसन मुश्रीफांनी दावा केलाय की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जातंय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला."
काय म्हणाले होते हसन मुश्रीफ?
"गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर माझे नेते (शरद पवार), महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच याबाबत मी सातत्यानं आवाज उठवला आहे. त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी सातत्यानं मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय."
"चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं.", असा आरोप मुश्रीफांनी केला आहे.