Chandrakant Patil on Hasan Mushrif : कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, असं म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले त्यावर मुश्रीफांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले पाटलांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोलात की, कारखान्यात 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत, त्या कंपन्या कुठे आहेत? त्या कंपन्यांनी सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी गुंतवणूक केली, यावर बोला ना, यावर बोलतच नाही. यावेळी मला मुश्रीफांना एक आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्यानं काम करायचं असतं." 


"पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता 8 झालेत, मुश्रीफ साहेब. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष 56ला मुख्यमंत्री 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली.", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी परवाच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की, हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणं ही मित्र या नात्यानं माझी जबाबदारी आहे. माझं नाव घेण्यासाठी आणि माझ्या विरोधा अब्रूनुकसानाचा दावा करण्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे." 


किरीट सोमय्या फक्त टूल, चंद्रकांत पाटील खरे मास्टर माईंड : हसन मुश्रीफ 


गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 


हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर माझे नेते (शरद पवार), महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच याबाबत मी सातत्यानं आवाज उठवला आहे. त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी सातत्यानं मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय."


"चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं.", असा आरोप मुश्रीफांनी केला आहे. 


गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप


गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.