मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं खरं पण ते किती दिवस चालेल? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कधी संवाद, कधी विसंवाद सुरु असल्याची चर्चा आहे. सत्तास्थापनेनंतर पवार-ठाकरे भेटी अनेकदा चर्चेत आल्या आहेत. त्यात अजित पवार उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेल्याचंही पाहिलं आहे.
पण कधी बदल्या, लॉकडाऊन, आदित्य ठाकरे तर कधी पार्थ पवारांवरून या दोघांमध्ये एकमत नसल्याचं बऱ्याचदा समोर आलंय. त्यात पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यांनं आता शिवसेना संभ्रमात पडली आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतली होती. आता शरद पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार काय करणार याबद्दल सेनेत कुजबुज सुरु आहे.
पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
काका, आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार!
सेनेच्या आमदार, नेत्यांमध्ये कुजबुज
महाविकास आघाडीची निर्मिती होत असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुन्हा याचीच पुनरावृत्ती होणार नाही ना? याची खबरदारी शिवसेना घेताना दिसतेय. शिवसेनेचे आमदार आणि नेते सध्या यावर आपआपसांत चर्चा करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर भाजपच्या काही जुन्या मित्रांकडून देखील कानोसा घेण्याचं काम सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये काय चर्चा सुरु आहे याचादेखील आढावा घेतला जातोय.
अजित पवारांची चिंता करू नये
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अजित पवारांबद्दल विचारले असता त्यांनी पार्थ पवार हा विषय त्यांच्या कुटुंबियांचा आहे आणि अजित पवार हे आमचे महत्वाचे नेते आहेत. तुमच्या मनात जे आहे तसं काहीही होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
अजित पवार राष्ट्रवादीसोबत
अजित पवार हे आमचे नेते आहेत आणि महाराष्ट्रासाठी ते काहीही चुकीचं पाऊल उचलणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. सकाळी लवकर ऊठून मंत्रालयात येणे, दौरे करणे, अधिकाऱ्यांच्या बैठका यात अजित दादा सध्या जोरदार काम करत आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावणे हा दैनंदिन उपक्रम सुरु आहे. त्यामुळे ज्यांना वाटतंय अजित दादा पुन्हा सोबत येतील त्यांनी स्वप्नातच रंगावं अशा शुभेच्छाही राष्ट्रवादीच्या नेत्यानं दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न, बारामतीत बैठक
- आजोबांचा सल्ला आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल : सामना
- 'नया है वह', छगन भुजबळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं वर्णन
- 'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट
- 'पक्षाला अडचणीत आणणारे बेजबाबदार वागणे टाळावे', पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख शरद पवार यांचा पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष इशारा