मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश झोतापासून दूर गेलेले पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी आजोबा शरद पवार यांनी थेटच पार्थ बाबत टिपणी केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हरल्यानंतर पार्थ पवार राजकरणात सक्रिय नव्हते. पण सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून पार्थ पवार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.


सुशांत प्रकरणी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बिहार पोलीस मुंबईत आले, प्रकरण कोर्टात गेले. महाविकास आघाडी अडचणीत येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास द्यावा अशी मागणी केली. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा यांना अडचणीत आणणारी भूमिका राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने भूमिका का घेतली? गृहखाते राष्ट्रवादीकडेच असताना पार्थ पवार यांनी सीबीआयच्या चौकशीची मागणी केल्याने शिवसेनेच्या गोटातही चर्चा सुरू झाली.


पार्थ पवार यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी सीबीआय चौकशीची गरज नाही हे स्पष्ट केलं. मुंबई पोलीस तपास करतील. हा वाद शांत होत असतानाच पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजन दिवशी जय श्री राम म्हणत अजून एकदा पक्षांशी विसंगत भूमिका मांडली. या वेळी सुप्रिया सुळे यांनी सांभाळून घेत ही पार्थ पवार याची वैयक्तिक भूमिका सांगत विषय टाळला तरी चर्चा मात्र सुरूच राहिल्या.अजित पवार यांना न सांगता पार्थ पवार भूमिका मांडतात का? पहिल्यांदा जर चूक झाली तर दुसऱ्यांदा पुन्हा तीच चूक कशी? असे प्रश्नही विचारले राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले.


पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्याने मांडलेल्या भूमिकेबाबत अजित पवार यांना काहीच माहीत नाही. पार्थने एका पीआर एजन्सीला काम दिले आहे त्यातून हे वाद झाल्याची चर्चा दुसरीकडे सुरू आहे. पार्थ पवार यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीमुळे राष्ट्रवादीची आणि अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना अखेरीस आज खुद्द शरद पवार यांनीच मौन सोडलं आणि पार्थ पवारच्या मागणीला कवडीची किंमत नाही म्हणत तो अपरिपक्व असल्याचं स्पष्ट केलं.


शरद पवार यांनी पहिल्यांदा आपल्या नातवाला सार्वजनिकरित्या फटकारले आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करून थेट मेसेज दिला. शिवसेनेला मेसेज की राष्ट्रवादी ही शिवसेनेबरोबर आहे. तसेच पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य पार्थ पवार यांनी पवार यांनी करू नये. पार्थ पवार यांचा बेजबाबदार वागण्याबाबत हा इशाराच पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख शरद पवार यांनी दिला आणि या विषयावर पडदा टाकला आहे.


संबंधित बातम्या :




शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचं विश्लेषण