Noora kushti: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना फडवणीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, अशा शब्दात टीका केली. ज्यानंतर नुरा कुस्ती म्हणचे काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. नुरा कुस्ती हा शब्द नवा नाही. याआधीही राजकारणात नुरा कुस्तीचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं जातं. नुरा ही अशी कुस्ती असते ज्यात दोन्ही पैलवान दिखाऊपणासाठी एकमेकांशी लढतात. परंतु, या लढतीचा निकाल अधीच निश्चित असतो. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी दोघांमध्ये लढाई केली जाते. नूरा हा शब्द कसा तयार झाला? नुरा कुस्तीचा नेमका अर्थ काय होतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


नुरा कुस्तीचा अर्थ सामान्यतः "निश्चित लढा" किंवा लढण्याचे नाटक करणे असा होतो. या कुस्तीत प्रेक्षकांना मुर्ख बनवण्यासाठी लढण्याचं नाटक केलं जातं. या शब्दाचा प्रयोग राजकारणात सर्वाधिक केला जातो. राजकारणात दोन पक्ष एकमेकांना विरोध दर्शवतात. परंतु, वास्तविकता दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढण्याचं नाटक करत असतात. केवळ या दोघांनाच हे माहिती असतं की त्यांचा एकमेकांना असलेला विरोध केवळ प्रेक्षकांची फसवणूक करण्यासाठी आहे. हा राजकीय मक्तेदारीचा एक प्रकार आहे.


नुरा कुस्ती या शब्दाची उत्पत्ती कशी झाली?
पूर्वीपारपासून सांगत आलेल्या कथेनुसार, मध्य प्रदेशच्या शिवपुरी गावात नुरा नावाचा व्यक्ती राहायचा, तो आपल्याच कोंबड्यांना आपापसात लढवायचा. या लढतीत कोणता कोंबडा जिंकणार? हे त्याच्या इशारावर अंवलंबून असायचं. कदाचित ही जगातील सर्वात पहिली मॅच फिक्सिंग असू शकते. नुराबद्दल क्वचितच काही लोकांना माहिती असेल. परंतु, नुरा कुस्ती नेमकी काय असते? याची अनेकांना कल्पना आहे. नवाबांच्या काळात कोंबडीची कुस्ती खूप प्रसिद्ध होती. या कुस्तीवर मोठ्या प्रमाणात लोक मोठी पैज लावायचे. तसेच जो व्यक्ती या कुस्तीचं आयोजन करायचं त्यालाही कमिशन मिळायचं. नुरा हा देखील कोंबडा कुस्तीचं आयोजन करायचा. परंतु, देशभरातील कोंबडा कुस्ती आणि नुराची कोंबडा कुस्ती यात मोठा फरक होता. नुरानं त्याच्या कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं होतं. जे त्यानं इशारा करताच कुस्ती हारायचे. ज्यामुळं नुराला अधिक नफा मिळत असे. मात्र, हळूहळू नुराच्या फिक्सिंगची जाणीव सर्वांना होत गेली आणि कोंबड्यांच्या या कुस्तीला नुरा कुस्ती असं नाव देण्यात आलं. काळंतरानं याचं रुपांतर म्हणीत झालं. नुरा कुस्ती अशी स्पर्धा म्हणजे ज्यात अधीच निकाल ठरलेले असतात. नुरा कुस्ती या शब्दाचा प्रयोग शिवपुरी भागात वारंवार केला जातो. 


पैलवान गणेश मानुगडे म्हणतात...
राजर्षी शाहू महाराजांनी 1992 साली रोमच्या ऑलिम्पिक मैदानाच्या तोडीचे कुस्ती मैदान कोल्हापूरात बांधले. या मैदानात कुठेही बसून कुस्तीचा सामना सहज पाहता येऊ शकतो. महाराजांनी स्वताच्या देखरेखीखाली हे मैदान बनवले. दक्षिणोत्तर तटबंदी, बांधकाम आणि मधल्या भागात टुमदार इमारत हे सर्व शाहुराजनी आपल्या देखरेखीखाली बनवून घेतली. या मैदानाच्या भागाभागावर महाराजांच्या श्रमाचे मोती विखुरले गेले आहेत. हे मैदान पुनीत,पावन झाले आहे. खासबागेच्या उद्घाटनासाठी जगत्जेत्या गामाचा बुरुजबंद भाऊ इमामबक्ष आणि वाघासारखी कडवी झुंझ देणारा गुलाब मोइद्दिन या दोन वाघ सिंहाच्या लढतीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. 


...म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या लाडक्या मल्ल्याच्या कानशिलात लगावली
कल्लू नावाचा एक मल्ल शाहुराजांच्या संस्थानात अश्रायीत होता. त्याच्या खुराकाची ,निवासाची आणि एकूणच सारी व्यवस्था महाराज स्वत करत असत. त्याचा सराव पाहायला राजे स्वत: लक्ष घालत असत. काही डावपेच तर खुद्द महाराजांनी त्याला शिकवले अशी नोंद आहे.  आपल्या लाडक्या मल्लाची कुस्ती किंकरसिंह नावाच्या विख्यात माल्लाशी आयोजित करण्यात आली होती. खासबाग मैदानात होणारी ही कुस्ती पाहायला जनमानसाचा महासागर तिकिटे काढून आला होता. विजेत्या मल्लास बक्षीस म्हणून देण्यात येणारी चांदीची गदा महाराजांनी स्वत करून घेतली होती. कारागिराला खास सुचना देवून हि गदा बनवण्यात आली होती. कल्लूच हे मैदान मारणार असा विश्वास शाहुराजना वाटत होता. ही कुस्ती प्रेक्षणीय होणार असे सर्वाना वाटत होते ,मात्र, प्रत्यक्षात असे मुळीच झाले नाही. ही कुस्ती नुरा झाली. बराच वेळ नुसती चौदंडी आणि रेटारेटी पाहून महाराजांसहीत सर्वांनी ओळखले की ही कुस्ती नूरा आहे. ज्यामुळं महाराजांना राग अनावर झाला. त्यांनी मैदानात जाऊन कल्लुच्या कानशिलात लगावून तिथून निघून गेले, अशीही माहिती पैलवान गणेश मानगुडे यांनी आपल्या लेखातून लोकांसमोर मांडली आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha