मुंबई : विधानसभेचे सदस्य आणि वडाळ्याचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोळंबकर थोड्याच वेळात राजभवनात शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी कोळंबकर यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, दिलीप वळसे पाटील यांची नावं देखील चर्चेत होती.  निवडीनंतर उद्या कोळंबकर हे सर्व आमदारांना शपथ देणार आहेत.


विधानसभा सचिवांकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावं आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात आल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं. उद्या विधानसभा सत्र सुरू झाल्यावर सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं आहे.

कोण आहेत कोळंबकर
कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले.

विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली होती. या यादीमध्ये भाजपच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या एका आमदारांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या यादीत शिवसेनेच्या एकाही आमदाराचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या यादीतीन सहा आमदारांची नावं
1) राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
2) कालिदास कोळंबकर - भाजप
3) बबनराव पाचपुते - भाजप
4) बाळासाहेब थोरात - काँग्रेस
5) के. सी. पाडवी - काँग्रेस
6) दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे. "तुला माफ केलं आहे. तू परत ये. राजीनामा दे किंवा उद्याच्या बहुमत चाचणीपासून दूर राहा. जर असं केलं नाही आणि सभागृहात येऊन व्ही जारी केलास तरीही पक्षाकडे 'ऑप्शन बी' तयार आहे," अशी ताकीद शरद पवारांनी अजित पवारांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यानंतरच अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.