Weekly Recap : आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 20  ते 26 फेब्रुवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यातील महत्वाची  घडामोड म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला  केंद्राची मंजुरी मिळाली.  MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी, बारावीच्या परीक्षेला सुरूवात, शिवजयंती वरून जेएनयूचा राडाअशा विविध घटना या आठवड्यात घडल्या आहेत. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा....


औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला  केंद्राची मंजुरी


औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली .  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री  अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी म्हटले. 


 MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार


 MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होते. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर  विद्यार्थ्यांकडून जल्लोष केला.  मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. 


सुप्रीम कोर्टात या आठवड्यात तीन दिवस सुनावणी


 सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  राज्यातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) लढाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे.  सुप्रीम कोर्टात या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाली आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनीही ठाकरे गटासाठी युक्तिवाद केला.  या दोन्ही ज्येष्ठ वकिलांनी राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला आहे.  सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.  


JNU मध्ये  राडा


 यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी झाली.  "दरवर्षी शिवजयंती (Shiv Jayanti) आग्रा किल्ल्यावरच (Agra Fort) साजरी करायची," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं.  दिल्लीच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे JNU मध्ये  वाद झाला. अखिल भारतीय विद्यार्थी  परिषद   (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून वाद झाला होता.


कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा  धुराळा


 कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा  हा शेवटचा आठवडा होता. त्यामुळे आठवडाभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला. कसबा मतदार संघात आज भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. शेकडो नेते, कार्यकर्ते आणि कसबेकरांच्या उपस्थित भव्य रो़ड शो आयोजित करण्यात आला होता.


सोनिया गांधींकडून राजकारणातून निवृत्तीचे संकेत


गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्तीसगड येथील रायपूर येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी संकेत दिले. आपला राजकीय प्रवास भारत जोडो यात्रेसोबत थांबू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या राजकरणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल


कांद्याने (Onion)  शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.  नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक तर वाढली आहे. मात्र कांद्याची मागणी कमी असल्यानं कांद्याचे दर घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरासरी 600-700 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत असून खर्चही भरून निघत नाही.  त्यातच देशांतर्गत मागणी कमी झाली असून निर्यात ही जवळपास बंदच  आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. मात्र येत्या काही दिवसांत असाच उद्रेक अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे