Ethanol Plant Fire In Ahmednagar: शनिवारची रात्र अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) नजीक बाभूळगाव आणि परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. संध्याकाळी साडेसहा वाजता शेवगाव तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या (Gangamai Sugar Factory) परिसरात असलेल्या इथेनॉल प्लँटच्या (Ethanol Plant) टाक्यामध्ये अचानक आग (Fire) लागली. एक-एक करत एकूण तीन इथेनॉल प्लँटच्या टाक्यामध्ये भीषण आग लागली. विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी या ठिकाणी कामगारांसह एकूण 32 लोकं उपस्थित होते. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने परिसरात गोंधळ उडाला होता. 


अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील शेवगाव तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात साडेसहा वाजता भीषण आग लागली. या कारखान्यातील डिसलेरी विभागातील इथेनॉल प्लँटमध्ये असलेल्या टाक्यांमध्ये ही आग लागली आणि मोठा स्फोट झाला. आगीची लागली तेव्हा त्या ठिकाणी 32 कर्मचारी कारखान्यामध्ये काम करत होते. परंतु सुरवातीला एक मोठा आवाज झाल्याने उपस्थित कर्मचारी तत्काळ तेथून बाहेर पडले. दरम्यान यात तीन जन जखमी झाले. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीमध्ये टँकर चालक आप्पासाहेब माणिक गोरेसह पंडित नागनाथ काकडे, अशोक अण्णासाहेब गायकवाड यांचा समावेश आहे. 


तब्बल 9 तास आग धुमसत होती


कारखाना प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या डिसलेरी विभागात इथेनॉल प्लँट आहे. ज्यात तिथे एकूण 29  इथेनॉलच्या टाक्या आणि तीन मळीच्या टाक्या आहेत. शनिवारी इथेनॉलच्या टाक्यांना आग लागली होती. ज्यात तीन टाक्या पूर्णपणे जळाल्या असून, इतर 11 टाक्यांना देखील आगीची झळ बसली आहे.  संध्याकाळी साडेसहा वाजता लागलेली ही आग पहाटे नियंत्रणात आली आणि विझली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 9 तास आग धुमसत होती. 


पोलिसांचा रात्रभर खडा पहारा


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 10 अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवत होत्या. पाथर्डी, शेवगाव, पैठण, औरंगाबाद आणि अहमदनगर येथून अग्निशामक दलाचे बंब बोलवण्यात आले होते. सोबतच या ठिकाणी पाच ते सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळाला. दरम्यान संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 9 तास लागले आणि यासाठी बचाव पथकाने संपूर्ण रात्र जागून काढली. तर पोलीस देखील रात्रभर खडा पहारा देऊन उभे होते. 


परिसरात भीतीचे वातावरण! 


अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील शेवगाव तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात साडेसहा वाजता भीषण आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. सुरवातीला झालेल्या स्फोटाचा जोरदार आवाज परिसरात गावात ऐकू आल्याने भीतीचे वातावरण पसरले. तर काही वेळात किमान पाच किलोमीटर पर्यंत दूरवरून आगीचे लोळ पाहायला मिळू लागले. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या गावात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक लोकं कारखान्याच्या दिशेने धाव घेत होते. रस्त्यांवर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत कारखानाच्या दिशेने धाव घेत असल्याचे पाहून प्रत्येकाच्या मनात धडकी भरत होती. पण सुदैवाने एवढ्या मोठ्या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.   


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ahmednagar Fire : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग, जखमींवर उपचार सुरु