Sanjay Raut : असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजपा (BJP) हेच खरे राम-श्याम आहेत. शिवसेना आपल्या पायावर मजबूतीनं उभी असल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. जे सोडून गेले त्यांची पर्वा नसल्याचे राऊत म्हणाले. ओवेसी यांची पार्टीचं भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत असल्याचे राऊत म्हणाले. जिथं भाजपला जिंकायचे असते तिथं ओवेसी जात असतात. त्यामुळं त्यांनाचं राम-श्यामची जोडी म्हणलं पाहिजे असे राऊत म्हणाले.
काल (25 फेब्रुवारी) असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात अशा शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील मुंब्र्यात जाहीर सभेत ते बोलत होते.
पुणेकर घरी बसणार नाही, कसबा आणि चिंचवडमध्ये चांगलं मतदान होईल
पुण्यात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान सुरु झालं आहे. सध्या मतदान कमी होताना दिसत आहे. यावरुन संजय राऊतांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, वोटिंग पर्सन्टेज आता जरी कमी असलं तरी ते वाढणार आहे. पुणे आहे ते, त्या पद्धतीनेच मतदानाला सुरुवात होईल. पुणेकर घरी बसणार नाहीत. कसबा आणि चिंचवडमध्ये चांगले मतदान होईल. वाद आणि भांडणे होणार आहेत. कारण सरकारकडून कसबा आणि चिंचवडमध्ये मंत्री जाऊन बसले आहेत. हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. पराभवा समोर दिसत असेल तर लोकांना गोंधळ घालायला प्रवृत्त करत असल्याचे राऊत म्हणाले.
सावरकरांना भारतरत्न द्यावा
सावरकरांच्या विचारांचे सरकार राज्यात आणि देशात आहे असं वारंवार बोललं जातं. पण वीर सावरकरांनी भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, यांच्या तोंडाला फेस येतो असे राऊत म्हणाले. वीर सावरकर हे देशाच्या लढ्यातले महान क्रांतीकारक होते. देशात क्रांतीची मशाल पेटवणारे सावरकर महान नेते होते. ज्यांनी अंदमानमध्ये आयुष्यातील मोठा काळ व्यथीत केला. सामाजिक कार्यात त्यांनी काम केलं. बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा सावरकर यांच्यापासून प्रेरणा घेतल्याचे राऊत म्हणाले. सध्याच्या राजकारण्यांना सावरकर हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोप राऊतांनी केला. वीर सावरकरांचा अपमान या देशात काही लोक करत आहेत. त्यांना उत्तर द्यायचे असेल सावरकरांना सरकारनं भारतरत्न द्यावा असे राऊत म्हणाले.
गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मराठी भाषा आणि अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण
शिंदे गटानं मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा यासाठी ठराव केला आहे. आता केंद्रातही त्यांच्या महाशक्ती सरकार आहे. मग ही महाशक्ती मराठीच्या बाबतीत हात आखडता का घेते. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीच आक्रमण सुरु आहे. हे दुर्दैव असल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना मराठी अस्मितेसाठी केली असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: