नंदुरबार : तोरणमाळ खोऱ्यातील गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला होता. होळी सप्ताहात नव्याने या आठवडी बाजाराची सुरुवात झाली. किराणामालासाठी याआधी 30 ते 35 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. आता आठवडी बाजार सुरु झाल्याने हा त्रास आणि वेळ वाचणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी जल्लोष केला.   


सातपुड्यातील तोरणामाळच्या खोऱ्यातील आदिवासी बांधवांना आपल्या गृहपयोगी वस्तू आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी डोंगरदऱ्यांमधून आजही अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिथे रस्ते आणि वाहन पोहचत नाही, अशा या तोरणामाळच्या खोऱ्यात स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मदतीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडी बाजाराची सुरवात करुन एका नव्या इतिहासाला सुरवात करण्यात आली आहे.

पारंपरिक आदिवासी वेशभूषेत नृत्य करुन आदिवासी बांधवांनी होळी सणाच्या उत्साहात रंगले नसून, ते स्वागत करत आहेत ते आपल्याला होऊ घातलेल्या कमी त्रासाचा. पारंपरिक आदिवासी ढोल, घुंगरु, बासरी इत्यादींच्या ठेक्यावर ताल धरत हजारो आदिवासी बांधव आणि सजून-धजून पारंपरिक दागिने आणि वेशभूषा या डोंगरदऱ्यात जमले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आठवडी बाजाराचा आनंद ओथंबून वाहत होता.

....आणि आठवडी बाजार भरला!

तोरणमाळ पर्यटन क्षेत्राच्या खाली असलेल्या दरी-खोऱ्यातील दहा गावं आणि शेकडो पाड्यातील आदिवासी बांधव आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. या भागात रस्ते, वीज आणि पाणी नसल्याने या भागातील जीवनमानाची कल्पना करणे तशी अशक्यप्राय गोष्ट. त्यामुळेच जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य आपल्या शेतात पिकवयाचं आणि आवश्यक असलेल्या गोष्टी आठवडे बाजारातून खरेदी करुन गुजारा करायचा ही हे इथलं जीवनमान. मात्र, हाच आठवडी बाजार गाठण्यासाठी त्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करुन एकतर तोरणामाळ नाही, तर मध्यप्रदेश राज्यातील चेरवी हे गाव गाठावे लागते. या भागात रस्ते नसल्याने व्यापार होणार तरी कसा म्हणूनच ही कसरत त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक. मात्र, अशा अडचणींवर मात करण्यासाठी तोरणाळ ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडणून आलेल्या तरुण सरपंच आणि त्यांच्या टीमने या दरी-खोऱ्यातच आठवडे बाजार भरवण्याची संकल्पना माडंली आणि स्वातंत्र्यानतंर पहिल्यांदाच या भागात भरला तो असा आगळा वेगळा आठवडे बाजार.

या भागात पंतप्रधान ग्रामीण सडक योजने अंतर्गत रस्ते विकासाचे काम सुरु आहे. मात्र निधी नसल्याने हे रस्ते देखील अडकले आहेत. त्यामुळेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि या भागाचे आमदार आपल्या वाहनांची कसरत करत या आठवडी बाजाराच्या शुभारंभासाठी खास दाखल झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या आदिवासी बांधवांसाठी होऊ घातलेल्या या सोनेरी पानाला याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर देखील आवर्जुन उपस्थित होत्या. या साऱ्यांनीच आदिवासी पारंपरिक पद्धतीने नाचून या आठवडी बाजाराच्या उदघाटनाचे स्वागत केले. या खोऱ्यातील फलई या गावी आता दर शुक्रवारी आठवडे बाजार भरणार असून यासाठी व्यापारी हे मध्यप्रदेशमधून कसरत करत येणार आहे. मात्र हा बाजार यापुढे टिकवायचा असेल आणि आदिवासी बांधवाचे कष्ट कमी करावयाचे असेल तर महाराष्ट्रातू येणारे रस्ते तात्काळ बनवून वीज, पाणी रस्ता यांसारख्या मुलभूत सुविधा तात्काळ आदिवासी बांधवांना पुरवण्याची गरज स्थानिक आमदारांनी व्यक्त केली आहे.

आजही तोरणमाळच्या या दऱ्याखोऱ्यात दळण वळणाचे आणि वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून गाढवाचा उपयोग होत आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षे उलटत आली असली तरी या भागात वीज आणि रस्ते पोहचू शकली नाही, याहून मोठी शोकांतिका ती कुठली? म्हणूनच अनेक किलोमीटरची पायपीट कमी करणारा आणि आपले शारिरीक त्रास कमी करुन आपला जीवनावश्यक माल आपल्यासाठी जवळ उपलब्ध करुन देणारा हा आठवडी बाजाराचा आनंद या आदिवासी बांधवांसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नाही. त्यामुळेच तोरणमाळच्या या नव्या दमाने होऊ घातलेल्या नेत्यांनी आणि युवकांन उचलेले हे पाऊल मैलाचा दगडच म्हणावा लागेल.