मुंबई : कोरोना बाधितांच्या उपचारामध्ये प्राणवायू (ऑक्सिजन) महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र काही दिवसांपासून या प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.


काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 % व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा.


याप्रकरणी, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "सध्याच्या घडीला रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा राज्यात उपलब्ध आहे. आपल्याकडे रोज ऑक्सिजनचे 1012 मेट्रिक टन इतके उत्पादन होते. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णांना कोणत्याही प्रकारची तानाचाही भासणार नाही. काही ठिकाणी वाहतुकीच्या कारणांमुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब येत होता. मात्र उत्पादकांना याबाबतीत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच उत्पादकांना त्यांना ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढविणायचे आदेश दिले आहेत. शिवाय त्याच्या या कामामध्ये बाधा येऊ नये म्हणून एमएसइबीला योग्य तो विद्युतपुरवठा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे."


ते पुढे असेही म्हणाले कि, " काही खळगी कंपन्या त्याच्या कामाकरिता ऑक्सिजनचे उत्पादन करीत आहेत. या सहा कंपन्यांना संपर्क करून त्यांनाही रुग्णांना लागणार ऑक्सिजन कमी पडू नये म्हणूं त्यांना संपर्क साधण्यात आला असून त्यांचीही या कमी मदत घेतली जाणार आहे. अशा अनेक कंपन्यांना संपर्क करण्याचे काम सुरु आहे. मार्च महिण्यापासून आम्ही रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या गरजेवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यापद्धतीने उत्पादकांना सूचना देत आहोत."


सध्या राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या 25 कंपन्या असून 65 बॉटलिंग किंवा रिफिलिंग च्या कंपन्या राज्यात ऑक्सिजन उत्पादन करण्याशी संबंधित काम करीत आहे. तसेच राज्यात ऑक्सिजन सिलेंडरचा कुणीही काळाबाजार करणार नाही याची दक्षता घेत आहे.


कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते.


संबंधित बातम्या :