मुंबई : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोरोना विरोधातील लशीच्या मानवी चाचण्या तात्पुरत्या थांबविल्या आहेत. या चाचण्यांमध्ये लंडन येथील मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एका व्यक्तीला त्रास जाणवू झाल्याने निर्णय घेण्यात आला आहे. याच संस्थेशी भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या थांबविण्यात आल्याआहेत. या लसीच्या चाचण्या मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि के इ एम रुग्णालयात सुरु करण्यात येणार होत्या मात्र त्या चाचण्या जो पर्यंत केंद्र सरकारकडून या संदर्भातील निर्णय येणार नाही तो पर्यंत करणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मसुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन केले आहे. या लसीच्या पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरवात करण्यात आली होती मात्र ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लसीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने त्यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकारचा परिणाम भारतात होणारी मानवी चाचण्यांच्या कामावर झाला असून येथेही चाचण्या होणाऱ्या काही काळाकरिता थांबवित आहोत असे सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केले आहे.


याप्रकरणी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एबीपी डिजिटलशी बोलताना सांगितले कि, "या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आमच्या महापालिकेच्या रुग्णलयात सुरु करणार होतो. पालिका प्रशासनाने यापूर्वीच या चाचण्या संदर्भातील काही प्रश्न आयसीएमआर यांना पत्र पाठवून विचारली होती त्याची उत्तरे अद्याप आलेली नाही. त्यामुळे असेही आम्ही मानवी चाचण्याचे काम सुरु कारणार नव्हतो त्यात आता हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आम्ही ह्या चाचण्या करणार नाही आहोत."


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील 10 संस्थांची निवड केली असून याकरता1600 निरोगी व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील केइएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती . प्रत्येकी केंद्रावर 160 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार होत्या . या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात येणार होती . कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन- तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.


ज्यावेळी मुंबईतील दोन संस्थांमध्ये या लसीच्या मानवी चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रसारित झाली होती, त्यावेळेपासून अनेक स्वयंसेवकांनी चाचणी करून घेण्यासाठी सहमती दाखवली होती. अनेक नागरिक दोन्ही रुग्णलयातील दूरध्वनीद्वारे फोन करून विचारणा करत होते.


संबंधित बातम्या :



Corona Vaccine Update | कोरोना लसीवरील संशोधनाला भारतात मोठा ब्रेक; सीरम इन्स्टिट्यूटने ट्रायल्स थांबवल्या