मुंबई : राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असून काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळेल. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. यामुळे शेतीसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. परभणीतील पुर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस त्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालं आहे. आज दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे, तर त्याउलट उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.


या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा


कोकणात आज पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत कोरडं वातावरण पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, हवामान विभागाने पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.


कुठे ऊन, कुठे पाऊस


आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती असण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी रात्र तापमान वाढण्याची शक्यता असून उष्ण रात्र असण्याचा अंदाज आहे.


मुंबईतील हवामान कसं असेल?


पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील. उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि आणि किमान तापमान 27  अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दरम्यान, राज्यात सोलापूरच्या जेऊर येथे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथे 22 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं आहे.


कोकणात पावसाची हजेरी


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लावलीय. ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटासह सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान होणार आहे. कणकवलीतील असरोंडी, पिसेकामते परिसरात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


आंबा आणि काजू पिकांचं नुकसान


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान पावसाच्या सरी बरसत असल्याने काही ठिकाणी गारवा जाणवला. पण, रिमझिम पाऊस थांबल्यावर मात्र उकाडा कमालीचा वाढत आहे. तळकोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे.