IMD Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे. 


रब्बी हंगाममधील फळपिकांना फटका


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.


पावसामुळे वातावरणात गारवा


गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चीचगड परिसरामध्ये सोमवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या कुठल्याही पिकांचे नुकसान झालेले नाही. मात्र, सुमारे अर्धा तास पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


गहू, हरभरा, संत्रा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा


वर्ध्यातील आष्टी, कारंजा तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. रात्री जवळपास अर्धा तास कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.


शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता  


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये चार वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कान्हेरगावनाका, कान्हारखेडा, कलबुर्गा, फाळेगाव, या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. तर, या पावसाचा शेतातील पिकांना मोठा फटाका बसणार आहे. कापणीला आलेला गहू, कापूस, हरभरा यासह भाजीपाला वर्णीय पिकांना या पावसाचा मोठा फटाका बसला आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.


गारपिटीचा चंद्रपूर जिल्ह्यातील 5 तालुक्याला फटका


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा 5 तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुरणा आणि चिमूर तालुक्यांना मोठा फटका बसला असून हजारो हेक्टरमधील चणा, गहू, मिरची आणि इतर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.