Marathi Bhasha Gaurav Din : आज 27 फेब्रुवारी, आजचा दिवस 'मराठी भाषा गौरव दिवस' (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न म्हणजेच, 'कुसुमाग्रज' (Kusumagraj). अर्थातच, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 


कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण 'मराठी राजभाषा दिन' असंही म्हणतात. पण 'मराठी भाषा गौरव दिवस' आणि 'मराठी राजभाषा दिवस' हे दोन्ही वेगवेगळे आहेत. 


महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा, तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला. त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं. त्यामुळे आज 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो आणि 1 मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जातो. 


महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं दैदीप्यमान रत्‍न म्हणजे, 'कुसुमाग्रज' 


महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचं जन्मगाव. वि. वा. शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव कुसुम होतं. त्या नावावरुनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेनं आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीनं जागतिक दर्जाचं लेखन केलं. 


आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन सरकारनं म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 


कुसुमाग्रजांनी मराठीसाठी जीवन वेचलं 


मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीनं त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावानं त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे. 


अक्षरबाग (1990), किनारा(1952), चाफा(1998), छंदोमयी (1982), जाईचा कुंज (1936), जीवन लहरी(1933), थांब सहेली (2002), पांथेय (1989), प्रवासी पक्षी (1989), मराठी माती (1960) ही कुसुमाग्रजांचे गाजलेले कवितासंग्रह. तर, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटकं. कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्याही कुसुमाग्रजांनी लिहिल्यात.