जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे  रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात  गारपीट आणि मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस आणि गारपिटीचा जोर प्रचंड होता. त्यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते. तसेच अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी (Farmers) हवालदिल झाले आहेत. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने  रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक गहू, मका आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.


जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून दोघांचा अंत


जालन्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये ज्वारी, मिरची, शेडनेट भाजीपाल्याचे चांगलेच नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्याने शेतातील उभी पीक झोपून गेली. 


हवामान खात्याने या भागात गारपीट व अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. काही वेळताच प्रचंड गारपीट झाल्याने जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये धांदल उडाली. यात अकोलादेव, टेंभूर्णी, भारज, काळेगाव, नांदखेडा अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. कुंभारी येथील पल्लवी विशाल दाभाडे (वय १९) या महिला शेतकऱ्यासह सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड ( वय ३८) या दोघांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला.


आणखी वाचा


"प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार"; शेतकरी आंदोलनावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया