मुंबई : गेल्या काही दिवसात वातावरणात (Weather Update) अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) सावट आहे, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील 24 तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागात तापमानाता प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेची लाट
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन
पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या देखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर कोकणात कमाल तापमान 40 च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात पावसाची शक्यता
पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान
वादळीवारा आणि गारपीटसह आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसानं शेत पिकांसह फुल शेतीचेही नुकसान झालं आहे.भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेकांच्या घरातील टिनपत्रे उडालीत तर काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्यात. झाडे उन्मळून पडली आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील भाळवणी गावात अवकाळी पावसाने फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये तारांबळ उडाल्याचे चित्र दिसलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :