मुंबई : महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) तर कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे.


पुढील 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज


विदर्भ, मराठवाड्याला गेल्या चार-पाच दिवसात पावसानं झोडपून काढलं आहे. पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.






मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा


हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात सरासरी तापमानात 4.5 अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज कमाल तापमान 37-39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


अवकाळीसह गारपीट, पिकांना फटका


राज्यात आजही अवकाळीसह गारपीट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीचे तांडव अद्यापही सुरुच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने हजारो हेक्टरवरील पिके नाहीशी झाली असताना पाऊस अद्यापही सुरुच आहे.


या राज्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता


महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक बदल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कर्नाटकातही 17 एप्रिलपर्यंत येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain Alert : मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट; विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट