मुंबई : आज राज्यासह देशात पावसाची हजेरी (Rain Alert) पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, नव्याने सक्रीय होणाऱ्या वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर (Weather Update Today) परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.


पुन्हा एकदा हवामानात बदल


राज्यासह देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात तापमानाचा (Temperature) पारा वाढला आहे. तर, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळत असून काही ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे.


पुढील 48 तास मुसळधार पाऊस


वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज मैदानी भागात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तर ईशान्य भारतात पुढील 48 तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


काही भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज


आसाम आणि मेघालयमध्ये 31 मार्चला खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 31 मार्च आणि 1 एप्रिलला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात आज आणि उद्या मुसळधार पाऊस आणि काही भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 31 मार्चला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता


राज्यात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 24 तासात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. भंडारा, हिंगोली, नाशिक, नागपूरमध्ये शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे पुणे, ठाणे आणि मुंबईत उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी


दिवसभर उकाड्याने असह्य होत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह भंडारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील भात पिकांना फायद्याचा झाला आहे.


हळद, ज्वारीसह अन्य भाजीपाला पिकांच्या नुकसानीची शक्यता 


हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या वसमतकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाने शेतातील हळद ज्वारी यासह भाजीपाला वर्णीय पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता.