मुंबई: राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये तपासयंत्रणांच्या कचाट्यात अडकलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यापैकी बहुतांश नेते हे भाजपमध्ये गेले आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते शुद्ध कसे होतात, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर कितीही गंभीर आरोप असलेला कलंकित नेता साफ होतो, असे उपहासाने म्हटले जाते. त्यामुळे अलीकडच्या काळात राजकीय वर्तुळात 'भाजपची वॉशिंग मशीन' हा शब्द चांगलाच रुढ झाला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) यांना एबीपीच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, पियूष गोयल यांनी चतुराईने मूळ प्रश्नाला बगल देत संभाषणाची गाडी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या किस्स्याकडे वळवली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


राज्यात सध्या भाजपच्या वॉशिंग मशीनची चर्चा आहे. त्याविषयी तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न पियूष गोयल यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गोयल म्हणाले की, माझ्या घरी 1984 सालीच वॉशिंग मशीन होती. 1984 मध्ये शिवसेना आणि भाजपची पहिल्यांदा युती झाली. त्या युतीची चर्चा माझ्या सायन येथील घरी झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आमच्या सायनमधील घरी अटलबिहारी वाजपेयी यांना भेटायला आले होते. बाळासाहेब ठाकरे आले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी आतल्या खोलीमध्ये झोपले होते. मी आतमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना उठवायला गेलो तेव्हा त्यांनी मला बाळासाहेब ठाकरेंविषयी काही प्रश्न विचारले, त्यांच्या येण्याचा हेतू विचारला. घराच्या आतल्या खोलीत आमचे संभाषण सुरु असताना बाळासाहेब ठाकरे हे आमचं घर पाहत फिरत होते, असे गोयल यांनी सांगितले.


बाळासाहेब ठाकरे ज्यादिवशी आमच्या घरी आले तेव्हाच माझा भाऊ परदेशातून परत आला होता. त्यावेळी आमच्या घरी वॉशिंग मशीन आणि ड्रायर होता. घरात फिरताना आमची वॉशिंग मशीन बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीस पडली. तेव्हा वॉशिंग मशीन नवीनच बाजारपेठेत आली होती. त्यामुळे लोकांना या गोष्टीचे अप्रूप होते. बाळासाहेब ठाकरे यांनाही वॉशिंग मशीनचे आकर्षण वाटले. त्यांनी पाहताक्षणीच वॉशिंग मशीन उघडली आणि आतून पाहिली. ही मशीन कशी चालते, याची सगळी माहिती त्यांनी घेतली, असे पियूष गोयल यांनी सांगितले. हा किस्सा सांगून पियूष गोयल यांनी वॉशिंग मशीनचा विषय संपला. 


आणखी वाचा


पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला जबरदस्तीने बसवलं, आयकार्डही जप्त केले; ठाकुर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल