मुंबई : देशातील अनेक भागांमध्ये हवामानात (Weather Update) झपाट्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीवर वाईट परिणाम होत असून लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊन अनेक लोक आजारीही पडत आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रातही आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे ऊन तर कुठे पाऊस
देशात पुढील 24 तासात कुठे ऊन तर कुठे पाऊस, असं चित्र पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) आणि हिमवृष्टी (Snowfall) तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह काही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज
आज रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने, पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.