वाशिम : देशासाठी काम करताना एकही दिवस सुट्टी न घेणारा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी, मनोज कुमार (manoj Kumar) यांच्या चित्रपटातील 'रोटी कपडा और मकान' देणारा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उधळली. विरोधकांकडे सोनिया गांधी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे असतील, पण आमच्याकडे फक्त एकच मोदी आहेत असंही ते म्हणाले. राजश्री पाटील या माहेरची लेक आहे, त्यामुळे माहेरच्या लेकीला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. वाशिम-यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


वादळवाऱ्यांशी लढणारी महायुती


एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही वादळी वाऱ्याशी टक्कर घेणारे आहोत. अनेक वादळं  झेलून महायुती टिकून आहे. महायुतीची मजबूत मूठ आहे. आमच्या सभेला चांगले दिवस आहेत. पाऊस पण स्वागताला आलाय.  यापुढेही अनेक वादळ येतील, आता भावना गवळीदेखील सोबत आहेत. 25वर्षे त्यांनी खासदार म्हणून काम केलं आहे. मी भाऊ म्हणून तुमच्या पाठिशी आहे. 


विरोधकांच्या 40 जागाही येणार नाहीत


देशाच्या विकासाची, प्रगतीची ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेता बनवण्याएवढ्याही जागा विरोधकांच्या येणार नाहीत. यावेळी विरोधकांच्या देशभरातून 40 जागाही येणार नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 


फेसबुक लाईव्ह करून उंटावरून शेळ्या हाकणार नाही 


फेसबुकवरून लाईव्ह करून उंटावरून शेळ्या हाकणार नाही, शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मी मुख्यमंत्री आहे. मी अनेकांची दुखणे दूर केली, अनेकांचे मोठे मोठे आजार दूर केलेत, अनेकांचे मानेचे पट्टे उतरवले. उद्धव ठाकरे आधी फिरले असते तर आम्हाला कशाला हा निर्णय घ्यावा लागला असता? उद्धव ठाकरे म्हणजे अहंकारी राजा आहेत. 


रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत राज्याच्या हितासाठी काम करणार


उद्धव ठाकरेंनी विचारांशी प्रतारणा केली, काँग्रेससोबत जाऊन गद्दारी केली, बेईमानी केली. कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करणार म्हणाले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. भावना गवळी यांनी खासदार म्हणून केलेली 25 वर्षांची पानं ही विकासाने भरली आहेत, आता यवतमाळ वाशिमधून राजश्री पाटील याच निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्याच्या हितासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करत राहणार असंही ते म्हणाले. 


ही बातमी वाचा :