Weather Update :  मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण आहे. अनेक ठिकाणी आकाश ढगाळ झाले असून, उन्हाचा चटका देखील कमी झाला आहे. परंतू, विदर्भासह उर्वरित राज्यात मात्र कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे पोहोचल्याने उन्हाची काहिली वाढली आहे. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. 


दरम्यान, एप्रीलमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंशापासून 46 अंशपर्यत जाईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. राज्यात 11 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहील  व वाऱ्याचा वेग वाढेल. राज्यात 38 अंश पासून 45 अंश पर्यंत उन्हाचा पारा वाढेल. 11 एप्रीलपर्यंत सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी,  चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तर तुरळक ठिकाणी  पाउस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


सध्या विदर्भात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. वाढत्या उन्हामुळ लोकांना त्रास होत आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोल्यात झाली. रविवारी अकोल्यात 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसच्या वर आहे. राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांनी वाढले आहे. त्यामुळं विदर्भात उन्हाच्या झळा व उकाडा अधिक जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
 
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हातातोंडाशी आलेले गहू पीक क्षणात जमीनदोस्त झाले. तर आडसाली ऊस पीकही वादळाने खाली कोसळला आहे. पुन्हा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी, शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: