मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांची ऑनलाईन बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक होणार आहे. त्यामध्ये द्विपक्षीय सहकार्य, इंडो-पॅसिफिक प्रदेश, दक्षिण आशिया आणि जागतिक परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक संध्याकाळी 7.30 ते 8.00 वाजण्याच्या दरम्यान होणार आहे.


पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची आज निवड होणार आहे. संयुक्त विरोधी पक्षाचे नेते शाहबाज शरीफ हे पंतप्रधान होणार असल्याचं स्पष्ट आहे. इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना परदेशी जाण्यास बंदी घालावी अशी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी होणार आहे. 
 
श्रीलंकेत महागाईविरोधात नागरिक रस्त्यांवर, राष्ट्रपती गोताबाया यांनी राजीनामा देण्याची मागणी
श्रीलंकेत राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. वाढत्या महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. 


रशिया-युक्रेन युद्धाचा 47 वा दिवस


मध्य प्रदेशच्या भाजप नेत्या उमा भारती या रायसेन किल्ल्यातील शिव मंदिराला अभिषेक करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 


गोरखनाथ मंदिरातील सुरक्षा रक्षकांवरील हल्ल्यातील आरोपी अहमद मुर्तजा अब्बासीला आज पुन्हा गोरखपूर कोर्टमध्ये हजर करणार आहेत. 
 
पंजाबच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची राहुल गांधीसोबत भेट
पंजाबचे नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग तसेच भारत भूषण आशी, विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा हे आज सकाळी 10.30 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. 


सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी



  • या वर्षी सुरु होणाऱ्या जनगणनेमध्ये जातीय गणना करावी अशा आशयाची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 

  • व्यापम घोटाळ्यातील व्हिसलब्लोअर आनंद राय यांच्या अटकेच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यावर आज सुनावणी होणार आहे.


आंध्र प्रदेशचे नवे मंत्रिमंडळ शपथ घेणार
आंध्र प्रदेशमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत असून त्यामध्ये 24 आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 


किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी शक्य
विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणी आरोप करण्यात येणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी शक्य होणार आहे. 


मुंबई पोलिसांची प्रवीण दरेकरांना चौकशीसाठी नोटीस
मुंबै बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची 'मजूर' प्रवर्गातून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एमआरए पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे. 11 एप्रिलला सकाळी 11 वाजता हजर राहा असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. मुंबै बँकेच्या निवडणुकीतील 'मजूर' प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. 


आयपीएलचा सामना
आयपीएलचा हैदराबाद आणि गुजरात  असा सामना मुंबईत होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे होणार आहे.


क्रांतिकारक, विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांचा जन्मदिवस. 
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 


 
11 एप्रिलच्या महत्त्वाच्या घटना


·1827: समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले का जन्मदिवस


·1869: कस्तूरबा गांधी यांचा जन्मदिवस


·1919 : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना


·1999 : अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.