शिर्डी : साई भक्तांच्या मागणीनंतर आता साई दर्शनाला‌ जाताना भारतीय पेहरावात या असं आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केलय आणि तसे फलक देखील साई संस्थानने मंदिर परिसर तसेच प्रवेशद्वारावर लावले आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या या निर्णयाची अंमलबजवणी आजपासून सुरू करण्यात आल्याने जे भाविक तोकडे कपडे घालून येत आहेत त्यांना सुरक्षा रक्षक गेटवरच याबाबत सूचना देत आहे.


देश विदेशातील लाखो भाविकांचे साईबाबा श्रद्धास्थान असून दररोज असंख्य भाविक साईचरणी नतमस्तक होतात. मात्र काही भाविक दर्शनाला येत असाताना पर्यटन स्थळी गेल्यासारखे तोकडे कपडे घालत असल्याने अनेक भाविकांनी संस्थानकडे याबाबत तक्रारी देखील केल्या होत्या. भारतीय वेशभूषा परिधान केलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश द्यावा यासंदर्भात गेल्या 10 वर्षापासून मंथन सुरू होते. संस्थानने भाविकांच्या मागणीची दखल घेत पुर्ण पोशाखात येण्याची विनंती केली होती मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. आता संस्थानने तसे फलक लावल्याने नविन चर्चेला सुरूवात झालीय. शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानच्या या निर्णयाच स्वागत केल आहे.


शिर्डीत येणा-या भाविकांनी देखील संस्थानच्या या निर्णयाचे स्वागत केले असून धार्मिक ठिकाणी देवाचे दर्शन घेताना भारतीय पोशाख योग्य असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे. या निर्णयाचा मात्र काही भाविकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतोय. तोकडे कपडे घातल्याने काही भाविकांना प्रवेश द्वारावरूनच मागे धाडले जात आहे. सुरक्षा रक्षक शॉर्ट कपडे घातलेल्या भाविकांना रोखत असल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे भाविकांमध्ये अचानक घेतलेल्या निर्णयाने नाराजी व्यक्त केली आहे. अचानक निर्णय घेण्याएवजी काही दिवस अगोदर सूचना दयायला हवी होती अस भाविकांचे म्हणणे आहे.


दरम्यान या सर्व नियमांसदर्भात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही फक्त सूचना, विनंती आणि आवाहन करत आहे. काही भाविकांनी तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही भाविकांनी दर्शनासाठी येताना भारतीय वेशभूषेत ‌यावे अस आवाहन केलं आहे. ड्रेस कोडची सक्ती केली नसल्याचे बगाटे यांनी सांगितलं आहे.


साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ड्रेसबाबत घेतलेला निर्णय सक्तीचा नसल्याच सांगितलं असल तरी अचानक हा निर्णय लागू झाल्यानंतर काही भाविकांना मनस्ताप करावा लागला आहे. तर अनेक महिला भाविकांनी या निर्णयाचे समर्थन केलं आहे.