कणकवली : आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा स्वतः राणे यांनी केली आहे. आज कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे म्हणाले की, जर भाजपने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर राजस्थान, मध्यप्रदेशप्रमाणेच लोकसभेत त्यांना मोठा धक्का बसेल.

दरम्यान राणेंचा स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे मात्र राणेंनी स्पष्ट केले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपली कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही राणेंनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढणार कि नाही हेदेखील राणेंनी स्पष्ट केले नाही.

शिवसेना 'इन', राणे 'आऊट'
कोकणात शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने नारायण राणेंना सोबत घेतले होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून एकमेकांचे शत्रू असल्याप्रमाणे वावरणारे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष युती करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपोआपच राणेंचा पत्त कट झाला आहे.

राणेंकडे सध्या एनडीएपासून वेगळे होण्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार केला असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.