अहमदनगर : भाजपाला कोणत्याही परिस्थिती पाठिंबा द्यायचा नाही, हे मी आधीच स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही भाजपाला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचा आदेश नाकारणाऱ्यांना नोटीस पाठवली असून येत्या 5 दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे बोलताना दिली. पक्षादेश नाकारणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या लोकांनी भाजपला पाठींबा दिला, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले.

नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, नगर महापालिका निवडणुकीनंतर इथले आमदार मला भेटायला आले होते. त्यावेळी मी त्यांनी मला संपूर्ण परिस्थिती सांगितली. तसेच शिवसेनेबाबतही मला त्यांनी सांगितले. मी त्यांना त्याचवेळी आपण वेगळा विचार करू. पण कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जायचे नाही, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही भाजपाला पाठिंबा दिल्याचे मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. येत्या चार ते पाच दिवसांत पक्षाची बैठक होईल. त्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. पक्षादेश न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

लोकांचा विश्वास असलेल्या संस्थांवर हल्ला होतोय
यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजप सरकारवर देखील टीका केली. या देशाच्या महत्वाच्या संस्थांमध्ये गोंधळ सुरु आहे.  लोकांचा विश्वास असलेल्या संस्थांवर हल्ले होत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सत्तेचा इतका अतिरेक होताना पहिल्यांदा पाहतोय, असेही ते म्हणाले. देशाच्या समोर आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांना नाउमेद करण्याची सरकारची भूमिका असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच परिवर्तनासाठी समविचारी पक्ष एकत्र येणार आहेत. समविचारी पक्षाला त्या- त्या राज्यात पाठिंबा देणार असून देशाला स्थिर सरकार देऊ, असेही ते म्हणाले. सोहराबुद्दीन प्रकरणी देखील त्यांनी यावेळी टीका केली.