मुंबई : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागलाय. कालपासून राज्यातल्या बहुंतांश शहरात पारा चांगलाच घसरला आहे. धुळे, नागपूर, नाशिकसह मुंबईतही थंडीचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान पुढील 24 तास थंडीचा कडाका असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. थंडीचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे मात्र अनेक ठिकाणी लोक थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत.
महाबळेश्वरमध्ये गोठताहेत दवबिंदू
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट कायम आहे. महाबळेश्वरमध्ये आज 7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हिवाळा सुरु झाल्यापासून महाबळेश्वरमध्ये पहाटेच्या सुमारास दवबिंदूही गोठल्याचं पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत.
पुणेकर घेत आहेत थंडीचा आनंद
पुण्याचं आजचं तापमान 6 अंशावंर पोहोचलं आहे. काल पुण्यात 11 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. पुणेकर सकाळच्या वेळी गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या संख्येतही चांगलीच वाढ झालेली दिसत आहे.
परभणीमध्ये धुक्याची चादर
कडाक्याच्या थंडीमुळे परभणीच्या पूर्णा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. जशा वाफा उकळत्या पाण्यावर येतात तसं धुकं पूर्णा नदीतून वर येत आहे. मागच्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात पारा घसरतोय. आज परभणीत 3.3 इतकं तापमान नोंदवण्यात आलं.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पारा 10 अंशखाली
विदर्भात थंडीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. नागपूरमध्ये आज 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपुरात 8.2, वर्ध्यात 7.5 तर वाशिममध्ये 8 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरलाय. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. वाशिमच्या चौकाचौकात नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे वाशिमच्या बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळतोय. भल्या पहाटे फिरायला जाणारे लोकही आता थंडीमुळे थोड्या उशिराने बाहेर पडत आहेत.
नाशिकमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी बाप्पांनाही शाल घातली
गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिककरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. नाशकात नागरिकांसोबतच गणपती बाप्पालाही हुडहुडी भरलीय. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी बाप्पांनाही शाल घातली गेलीय. नाशिक शहरातील कारंजा मित्र मंडळाचा चांदीचा गणपती आणि भद्रकाली परिसरातील साक्षी गणपतीला शाल आणि घोंगडे पांघरण्यात आले आहे.
राज्यात गारठा कायम, 24 तासात थंडीचा कडाका वाढणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2018 04:13 PM (IST)
पुढील 24 तास थंडीचा कडाका असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. थंडीचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे मात्र अनेक ठिकाणी लोक थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -