Sharad Pawar : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP in Nagaland) NDPP-भाजप सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एका बाजूला भाजपविरोधात भूमिका घेत असताना दुसरीकडे नागालँडमधील सरकारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही युती केलेली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांनी म्हटले की, नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य निवडून आले आहेत. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचं अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे, असे पवार यांनी म्हटले.
स्थैर्यासाठी पाठिंबा
शरद पवार यांनी म्हटले की, नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचा स्थैर्य येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण भाजपला आमचा पाठिंबा नाही, अशी स्पष्टोक्तीही पवार यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटले की, मला आश्चर्य वाटतं मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या प्रचारात देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघे गेले होते. मेघालयाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत असं म्हणत त्यांचा पराभव करा असं म्हटलं. निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहभागी झाले असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष
नागालँड विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील सत्ता समीकरणे पाहता, राज्यातील विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल अशी चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय, रामदास आठवले यांच्या आरपीआयला 2, लोकजनशक्ती पक्ष रामविलास पासवान यांना 2, तर जेडीयूलाही 1 जागा मिळाली आहे.
राष्ट्रवादी-भाजप जवळीक
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जवळीक असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. वर्ष 2014 मध्ये राज्यातील चारही प्रमुख पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढले. शिवसेना भाजपची जागा वाटपावरून युती तुटली. त्यावेळी निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने अचानक महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असं म्हणत भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर करत गुगली टाकली.
वर्ष 2019 मध्ये एकीकडे मविआचा प्रयोग होत असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लावली गेली होती. त्याचवेळी पहाटेच्या वेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि सकाळच्या सुमारासच्या शपथविधीचा अभूतपूर्व प्रयोग झाला. आता त्यात शरद पवारांची मान्यता होती की नाही याची चर्चा अजूनपर्यंत सुरुच आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: