बीड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अधिक विदारक होताना दिसत आहे. त्यावर राज्य सरकारने मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप त्यावर कारवाई होत असल्याचं दिसून नाही. बीड तालुक्यातल्या बोरखेड येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर (वय वर्ष 25) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या या तरुण शेतकऱ्याने तीन एकरावर कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याच्यावर असलेलं साडेतीन लाख रुपयांच कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता आणि याच विवंचनेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलंय. त्याच्या पाश्चात आई, वडील आणि एक भाऊ असून कुटुंबाचा करता आधारच गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.
नाफेडच्या कांदा खरेदीचा कुणाला फायदा?
कांद्याच्या दरावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापलं असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं. कांदा दरात किंवा नाफेडच्या खरेदीत कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना मिळून आलं नसल्याचे चित्र आहे आणि त्याचमुळे शेतकरी अद्यापही संतप्त आहेत. गेल्या वर्षी कांद्याला जो भाव मिळत होता त्याच्या अर्ध्यावर यंदा भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. त्यात नाफेड कांदा खरेदी करत असल्याचं कुठेही दिसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नाफेडनी कांदा खरेदी करुन गेल्या पाच वर्षात किती निर्यात केला असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होताना दिसत आहे. नाफेडकडून बाजार समितीमध्ये येऊन कांदा खरेदी केला पाहिजे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळं वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळं एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळं पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.
ही बातमी वाचा: