विदर्भासह मराठवाड्यात पाणीसंकट, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2017 11:37 AM (IST)
नागपूर : पावसाअभावी विदर्भात आणि मराठवाड्यात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षी जुलैपर्यंत 22 टक्के एवढा पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ 11 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भात पाणीसाठ्याअभावी यंदा शेती कशी करायची हा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातही पावसानं दांडी मारल्यानं बीडमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. खरंतर जून अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा पेरणीच्या कामांना वेग आला. पावसाचा जोर पाहून शेतकऱ्यांनी मूग, उडीद, कापूस, सोयाबिन पिकांची पेरणी केली. मात्र, गेल्या काही दिवसात पावसानं सुट्टी मारल्याने उगवलेली पिकं करपू लागली आहेत. यंदा बीडमधल्या 37 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तेव्हा पावसाअभावी शेती करायची तरी कशी असा प्रश्न बळीराजासमोर पडला आहे.