पिंपरी : खाजगी वाहनातून प्रवास करणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. खाजगी वाहनातून पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशाला लुटून त्याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या प्रवाशाला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. वाकडमधून हा प्रवासी एका खाजगी वाहनात बसला. मात्र पुढे जाऊन त्या वाहनातील व्यक्तींनी त्याच्याकडून पैसे, मोबाईल काढून घेत त्याला गंभीर मारहाण केली. मारहाण केल्यानंतर प्रवाशाला द्रुतगती मार्गावर सोडून दिले.

या प्रवाशानं जखमी अवस्थेत  4-5 किलोमीटर पायी चालत किवळे गाठलं. त्याला जखमी पाहून काही नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करुन लुटणाऱ्यांची गाडी मुंबईच्या दिशेने पसार झाली.