जळगाव : भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटू शकलेला नाही. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसंच ते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री देखील असल्याने त्यांच्या काळात तरी पाणी टंचाई कमी होईल, अशी आशा इथल्या नागरिकांना होती. मात्र पाणी टंचाईची समस्या पूर्वीप्रमाणेच राहिली असल्याने धरणगाव शहरातील हनुमाननगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी समस्या कायम स्वरुपी सोडवण्यासाठी साकडं घातलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे पंधरा ते वीस दिवसातून पाणी पुरवठा होत असल्याने जनतेला या मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे किमान पाच दिवस आड तरी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी संजय माळी यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या पत्राची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा होताना दिसून येत आहे.


संजय माळी यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव इथल्या पाणी टंचाई संदर्भात लेखी पत्राद्वारे मागणी केल्यानंतर एबीपी माझाच्या टीमने धरणगाव शहरातील विविध भागातील जनतेकडून पाणी समस्येबद्दल जाणून घेतलं. अनेक महिलांनी धरणगाव शहरात पाणी टंचाई भासत असून दर पंधरा ते वीस दिवसांनी महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याचं सांगितलं.




पंधरा दिवस पाणी साठवण करुन ठेवले तर त्यात अळ्या कीडे निर्माण होतात. त्यामुळे साठवण करुन ठेवणं ही कठीण समस्या असल्याचं या ठिकाणी असलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक महिलांना दूर विहिरीवरुन डोक्यावर पाणी आणावं लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी अपेक्षा या ठिकाणच्या महिलांनी व्यक्त केली आहे. पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कूपनलिका खोदण्यात याव्या, त्याचबरोबर बंद अवस्थेतील कूपनलिका तातडीने दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.


धरणगाव शहरातील पाणी टंचाई संदर्भात माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी म्हटलं आहे की आतापर्यंत आम्ही पाच ते सहा दिवस आड पाणी पुरवठा करत होतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पाईपलाईन ही ब्रिटिश काळातील असल्याने ती नेहमी दुरुस्त करावी लागत असल्याने, त्यासाठी लागणारा वेळ, त्यातच सुरु झालेलं लोडशेडिंग याचाही मोठा परिणाम पाणी पुरवठा नियमित सुरु ठेवण्यावर झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बारा ते पंधरा दिवसांनी केला जात असल्याची कबुली त्यांनी दिली.


नागरिकांना पाण्यासाठी होणारे हाल कमी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाण्यासाठी 27 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच या निधीतून पाणी पुरवठा योजना राबवली जाणार असल्याने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे


धरणगाव मनपाच्या पाणी पुरवठा अभियंत्याने म्हटलं आहे की आतापर्यंत पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता लोडशेडिंगमुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. जे पाणी सोडले जात आहे ते दीड ते दोन तास सोडले जात असून ते ही शुद्ध स्वरुपाचे आहे. जुन्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि वीज पुरवठा खंडित होत असल्याने नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. मात्र तरीही सोळा तास काम करुन आम्ही नागरिकांना पाणी मिळण्यासाठी काम करत असल्याचं म्हटल आहे. लवकरच नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी पाईपलाईन टाकली जाणार असून ते काम पूर्ण झाले की पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे