Prakash Ambedkar : राज्यात एकीकडे भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार पडण्याचे नवनवे मुहूर्त सांगितले जात आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगली आहे. त्यामुळे सरकार बरखास्तीसाठीच विरोधी भाजपच्या कायदा सुव्यवस्था खराब असल्याच्या वल्गना सुरू असल्याचा आरोपही वंचित बहूजन प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे सध्या राज्यातील विविध वादांमुळे हैराण असलेल्या महाविकास आघाडीसाठी आंबेडकरांच्या वक्तव्यानं काहीसं 'फिल गुड'चं वातावरण निर्माण झालं आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर आंबेडकरांनी चिंता व्यक्त करीत अकोल्यातील पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेला मैत्रीसाठी साद घातली होती. एकंदरीतच आंबेडकर 'महाविकास आघाडी'तील पक्षांसोबत मैत्रीची 'साखरपेरणी' तर करीत नाहीत ना?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


'भोंगा' मुद्द्यावरून 3 मेनंतर महाराष्ट्रात अघटीत घडविण्याचा डाव : प्रकाश आंबेडकर


भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात 3 मेनंतर राज्यात काही अघटीत घडविण्याचे प्रयत्न सुरूयेत का? अशी शंका यावेळी प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. मनसेच्या माध्यमातून अशा धृवीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळेच औरंगाबादेतील मनसेच्या सभेला परवानगी देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारच राज ठाकरेंच्या भूमिकेशी सुसंगत वागतंय का? असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सध्याच्या विद्वेषाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी 1 मेच्या महाराष्ट्रदिनी राज्यभरात 'शांतता मार्च' काढणार असल्याचं आंबेडकर म्हणालेत. यामध्ये राज्यातील विविध सामाजिक संघटनांना सामावून घेणार असल्याचं आंबेडकर म्हणालेत.  


भोंग्यांसंदर्भात महाराष्ट्राचं धोरण विचित्र : आंबेडकर


दरम्यान, 'भोंग्यां'च्या मुद्द्यावरून आंबेडकरांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने  भोंग्यांसाठी परवानगी  दिली आहे. आता राज्य सरकारने यासंदर्भातील धोरणाचा चेंडू केंद्राकडे टोलवत आपली त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते म्हणालेत. राज्यातले अनेक मंत्री ईडीच्या चौकशी कक्षेत असतांना भोंग्यांचा प्रश्न केंद्राकडे टोलवून सरकारला आपल्या मंत्र्यांना अभय द्यायचं आहे का?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केला आहे. यासंदर्भातलं राज्य सरकारचं धोरण विचित्र असल्याची टिका आंबेडकरांनी यावेळी केली आहे. 


रामनामाचा मुद्दा निकाली निघाल्यानेच 'हनुमान चालिसा'चा वापर


गेल्या तीन दशकांपासून भाजपच्या राजकीय केंद्रस्थानी असलेला रामाचा मुद्दा रामजन्मभूमी निवाड्यामूळे निकाली निघाला आहे. त्यामूळेच भाजपकडून 'हनुमान चालीसे'च्या माध्यमातून हिंदुत्ववादी राजकारणाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. त्याच्याच माध्यमातून महाराष्ट्रानंतर देशात राजकारण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचं आंबेडकर म्हणालेत. 


खासदार नवनीत राणांना आंबेडकरांचा टोला


मुलूंड न्यायालयाच्या निकालानंतरच खासदार राणांनी स्वत:च्या मागासवर्गीय असण्याबद्दल भाष्य करावं, असा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. आपण मागासवर्गीय असल्यानं महाराष्ट्र पोलिसांनी कोठडीत आपला छळ केल्याचा आरोप खासदार राणांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर बोलत होते. त्यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. यासोबतच मुळ प्रकरण मुलूंड न्यायालयात असल्यानं हे दोन न्यायालयच त्यांच्या मागासवर्गीय असल्याच्या दाव्याचा फैसला करणार असल्याचं आंबेडकर म्हणालेत.