Sangli Rain News : सांगलीत कृष्णा नदीकाठच्या (Sangli Krishna River) गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 40.5 फुटावरुन 40.2 फुटांवर आली आहे. पाणी पातळीत वाढ न झाल्यानं नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे वारणा नदीला पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून ( Almatti Dam) पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला आहे. पूर्वीचा 3 लाखांचा विसर्ग आता सव्वा तीन लाखांचा करण्यात आला आहे.


सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचे स्थलांतर


सांगलीत कृष्णा नदीच्या काठाला दिलासा मिळाला आहे. पाणी पातळीत वाढ झाली नाही. वारणा नदीला मात्र पूरस्थिती कायम आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ही  40.2 फुटांवर आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. 


कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाली


कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. कारण, एक म्हणजे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे काल संध्याकाळी बंद झाले आहेत. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अलमट्टी धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सव्वातीन लाख केला आहे. त्यामुळं पंचगंगा नदीची पाणीपातळी एक इंचाने कमी झाली आहे. पावसाचा जोर देखील काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा म्हणावा लागेल. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 7 इंच इतकी आहे.


पानशेत धरण 94 टक्के भरले


पुण्यातील पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पानशेत धरण जलाशय आज ( 28 जुलै 2024) सकाळी 5 वाजता 94 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणाही नदीपात्रात उतरु नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा


दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील सर्व नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. आणखी पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या: 


Satej Patil : कोल्हापूर, सांगलीला पुन्हा महापुराची धास्ती, अलमट्टी नियोजनासाठी सतेज पाटील कर्नाटक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला