Maharashtra Rain News: राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


चगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली 


गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसाचा फटका सांगीलसह कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 


कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर


सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी ही 40 फुटांवर गेली आहे.  ही इशारा पातळी आहे. पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अन्यथा 40 फुटाच्या आसपास पाणी पातळी स्थिर होण्याचा अंदाज आहे.