Water crisis In Marathwada: नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मान्सूनबाबत शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी असली तरी राज्यातील धरणसाठ्यात मोठी घट दिसत आहे. संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त 10 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या भीषण परिस्थिती दिसत आहे. कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे अनेकांना टॅकर्सचा आधार घ्यावा लागत आहे. (Water crisis In Marathwada)


मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात 8 टक्क्यांहून अधिक जलसाठा नाहीय. जायकवाडीचा पाणीसाठी 6 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. माजलगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठी आहे, मागील वर्षी याचवेळी 36 टक्के जलसाठा शिल्लक होता. 


मांजरा धरणात 1 टक्क्याच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी 42 टक्के धरणसाठा शिल्लक होता, अशी माहिती समोर येत आहे.  हिंगोलीतील येलदारी धरणात 29 टक्के पाणीसाठा आहे, सिद्धेश्वर धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. नगर जिल्ह्यातील भंडरदरा, मुळा आणि निळवंडेतही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ज्यात भंडरदऱ्यात 15 टक्के, मुळा धरणात 10.5 टक्के तर निळवंडेत 14 टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलढाण्याची ताहान भागवणाऱ्या खडकपूर्णा धरणानं तळ गाठलाय, फक्त पेनटाकळीत 14 टक्के तर नळगंगात 25.5 टक्के जलसाठा उरलेला आहे.


सोलापूरातील सीना नदी कोरडीठक्क


राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना सोलापूर जिल्हा मात्र तहानलेला आहे. पाण्याच्या संकटामुळे सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा तर अक्कलकोटमध्ये तब्बल पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडं झालंय.


पिण्याचं पाणी पाच दिवसांतून एकदा मिळतंय


नगरमध्ये सध्या नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून सहा - सहा दिवस पाणी येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 312 टँकर सुरु करण्यात आले आहेत. 


संबंधित बातमी:


Ahmednagar Water Tankers: पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट


गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून