लातूर : राज्यात एकीकडे पावसानं अक्षरश: थैमान घातलं असताना लातूरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची वेळ आली आहे. सप्टेंबरपासून लातूर शहराला महिन्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. पावसाने ओढ दिल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लातूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यायी व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.


नियोजन बैठकीत काय ठरले?


लातूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस झालेले नाही. त्यामुळे लातूर शहराला पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येत असून सप्टेंबर 2019 पासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.


मांजरा धरणात अत्यल्प पाणी उपलब्ध असून महापालिकेला देण्यात येणाऱ्या पाण्यात 15% कपात करुन ही पाणी कपात 50 टक्के करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने लातूर शहराला सप्टेंबर 2019 पासून महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा करावा. तसेच पुढील काळात पाऊस झाला नाही व धरणात पाणी उपलब्ध झाले नाही तर महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात आणखी कपात करण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे.


कशा प्रकारे करणार नियोजन?


लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजणीचे टँकरने पाणी आणणे आणि इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभागांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


मांजरा धरणात पाणी नसल्याने लातूरला भविष्यात पाणीपुरवठा करता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या पाणी पुरवठ्यामध्ये 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन थकबाकीसाठी खंडित करु नये.


या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. तसेच तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


पशुसवंर्धन विभागाने चारा उत्पादनाची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच चारा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,जिल्हयातील 71 गावांमध्ये 72 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. जळकोट, अहमदपूर व शिरुर अनंतपाळ या तालुक्यामध्ये एकही टँकर सुरु नाही.