धुळे : महाराष्ट्रात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असताना धुळ्यात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकरा पैकी तीन धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर उर्वरीत आठ धरणांमध्ये केवळ 3.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोनवद, कनोली, अमरावती या तीन धरणांचा जलसाठा शून्य टक्के आहे.


धुळ्यात केवळ 36.33 टक्केच पाऊस
धुळे जिल्ह्यात दीड महिन्याच्या कालावधीत केवळ अकरा दिवसच पाऊस पडला आहे. परिणामी धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात घट झाली आहे. त्यामुळे धुळेकरांपुढे मोठं जलसंकट उभं राहिलं आहे. शहराच्या 40 टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 20 टक्के पाणीसाठ्यात धुळेकरांची दीड महिना तहाण भागू शकेल. त्यामुळे धुळ्यातील अनेक भागात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.


धु्ळ्याच्या 60 टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या माध्यमातून आठवड्यातून केवळ एकदाच पाणी पुरवठा सुरु आहे. हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजचे सर्व दरवाजे पाटबंधारे विभागाने उघडले. त्यामुळे तापी नदी पात्रातील पाणीपातळी घटली आहे. परिणामी सुलवाडे पंप गृह येथील चार पंपांपैकी केवळ एकच पंप सुरू आहे.


धुळे शहराच्या कॉलनी, तसेच नवीन वसाहतींमध्ये नागरिकांनी बोअरवेल, विहिरींची पर्यायी व्यवस्था केली आहे.त्यामुळे या भागांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता जाणवत नाही. मात्र शहराच्या जुन्या वसाहती, बाजारपेठ परिसर, झोपडपट्टी परिसरात पाणी टंचाईची तीव्रता दिसून येत आहे. शहराच्या काही भागात भर पावसाळ्यात टँकर द्वारे पाणी पुरवठा होत आहे.