समाधान मानटे मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून रत्ना हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. हॉटेलबाहेर दोन व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. वादानंतर हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारात ते बोलत उभे होते. त्यावेळी वाद झालेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने धारदार शस्त्राने मानटे यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने मानटे यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप 18 वार केले. या हल्लात गंभीर जखमी झालेल्या मानटे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मानटे यांच्या हत्येची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकासह चार कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समाधान मानटे मूळचे बीडचे होते, मात्र विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. सांगली जिल्हा पोलीस दलात 2013साली ते भरती झाले होते. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते कार्यतर होते, मात्र त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली होती.