सोलापूर : सध्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातल्या महिलांना पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावोगावच्या महिला घागरभर पाण्यासाठी अक्षरशः घाम गाळताना दिसत आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांची पाण्यासाठीची भटकंती दूर करण्यासाठी पुढे सरसावली आहे सोलापुरातली एक महिला.


 

पाण्याने तुडुंब भरलेल्या आपल्या वाटर बँकेतून ही महिला संपूर्ण गावाला पाणी देण्याचं मोठं काम करते आहे. दुष्काळी परिस्थितीतही कोट्यावधी लिटर पाणीसाठा असलेली ही महिला आता गावासाठी ‘पाणीवाली बाई’ ठरली आहे.

 

सुमंगलाताईंची वॉटर बँकेची संकल्पना

 

सुमंगला देशपांडे... सोलापूर जिल्ह्यातल्या अंकोली गावातल्या शेतकरी कुटुंबातली एक महिला. शेतात राहून त्यांनी वॉटर बँकेसारखी अत्यंत उपयुक्त संकल्पना राबवली. सध्या सगळीकडचे जलस्त्रोत आटले असतानाही त्यांच्याकडे 3 कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. त्यांच्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रानोरान भटकण्याची वेळ आली आहे. महिलांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून सुमंगलाताईंनी त्यांच्या वॉटर बँकेतून गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ट्यांकरच्या माध्यमातून गावाला रोज 30 हजार लिटर पाणी त्या देत आहेत.
वॉटर बँकेतून जलसमृद्धी!
ज्या गावात राहून त्यांनी वॉटर बँक स्थापन करून जलसमृद्धी मिळवली त्याच कारण म्हणजे ही वॉटर बँके. त्याहून महत्वाच कारण म्हणजे या बँकेवर असलेली महिलांची मालकी. या वॉटर बँकेची संपूर्ण मालकी महिला सभासदांची आहे. ज्या अंकोली गावात दुष्काळ पडला आहे त्याच गावात या वाटर बँकेने महिला सभासदांना स्वावलंबन बहाल केलं आहे.

 

आणि पाण्यासाठी वणवण थांबली!

 

वॉटर बँकेतून रोज दोन टँकरच्या माध्यमातून गावाला पिण्याचं पाणी देण्यात येत आहे. गावातल्या महिलांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून एका महिलेने आपली पाण्याची बँक खुली केली. यामुळेच आज गावच्या महिलांची भटकंती थांबली. किमान गावातल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठीची तरी सोय झाली आहे.

 

वॉटर बँकेत 30 कोटी लिटर पाणी डीपॉझिट!
गावागावात वॉटर बँका निर्माण करून त्याची मालकी स्त्रियांच्या हाती दिली जावी. याचा पायलट प्रोजेक्ट म्हणजे अंकोलीची ही जलसंपन्न वॉटर बँक. प्रत्येक वर्षी या बँकेत 30 कोटी लिटर पाणी डीपॉझिट होतं. 25 कोटी लिटर पाणी वापरलं जातं आणि 5 कोटी लिटर पाणी कायमस्वरूपी बँकेत जमा असतं. अडचणीच्या काळात याचा वापर केला जातो. आज अंकोली गावाला पाणी टंचाईन ग्रासलं असल्याने या बँकेतून पाणी दिल जातं आहे.
वॉटर बँकेची चावी महिलांच्या हाती!

 

पाण्याचा भरमसाठ उपसा झाल्यानेच दुष्काळी परिस्थितीला सामोर जाव लागत. हेच पाणी स्त्रियांच्या मालकीच केल तर त्याचा योग्य वापर होतो. पाण्याची मालकी स्त्रियांच्या हाती असावी, हा वॉटर बँकेचा दंडक आहे. कारण महिला काटकसरीने पाण्याचा वापर करतात. पाण्याची बचत स्त्रियांकडून अधिक प्रमाणात होऊ शकते. दुष्काळी परिस्थितीतही ग्रामीण महिला पाण्याच्या बाबतीत श्रीमंत राहतील हे अंकोलीच्या वॉटर बँकेने सप्रमाण सिद्ध केलं आहे.