यवतमाळ :  यवतमाळच्या चिमुकलीची कविता थेट बालभारतीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे. सहावीत शिकणाऱ्या सोनाली फुपरेची 'झाड' ही कविता सहावीच्याच मराठी पुस्तकात अभ्यासक्रमासाठी असेल.


 

'झाड देते माया, झाड देते छाया' ही कविता निसर्गाचा संदेश देणारी, निसर्गाबद्दल मुलांच्या विश्वातील भावना सांगणारी आहे. हीच कविता या वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी म्हणून यावर्षी पहिल्यांदाच राज्यभरातील शाळांमधून इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून, बालभारतीने कविता मागविल्या होत्या. त्यात लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या कवितांपैकी सोनालीची 'झाड' ही कविता इतर सर्वांपेक्षा, सर्वांच्या पसंतीला पडली आणि त्याच कवितेची निवड नवीन सहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आली.  त्यामुळे सोनालीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

सोनालीला तिच्या शिक्षकांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलं. कारण सोनालीच्या शाळेत पाचवीपासून प्रत्येक विद्यार्थ्यांना कविता करण्यासाठी एक शब्द दिला जात. कीर्ती पेटकर या मराठीच्या शिक्षिकेच्या या स्तुत्य आयडियाचं फळ म्हणजे सोनालीची निवडण्यात आलेली कविता होय.



विशेष म्हणजे 'झाड' ही कविता बालभारतीला पाठविण्याअगोदर शाळेच्या 'मनातील चांदणं' या पुस्तकात छापून आली आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी शाळेने हा उपक्रम सुरु केला होता, त्यातही झाड ही कविता प्रकाशित झाली होती.
सोनालीचे आई वडील शेती करतात. त्यांना तीनही मुली आहेत. सोनालीचे कापरा हे गाव डोंगरात वसलेले आहे. आजूबाजूला जिवंत निसर्गचित्र पाहात पाहातच सोनालीच्या मनात कवितेचे बीज रुजले. त्यातून अनेक कविता सुचत गेल्या आणि सोनाली लिहित गेली. यातूनच झाड नावाची कविता पुढे आली आणि थेट सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली.

 

झाड देते माया, झाड देते छाया
झाड आहे हिरवेगार

वारा देते थंडगार

झाडाच्या सावलीत मी बसते

झाड खुदकन् गालात हसते

झाड देते माया

झाड देते छाया

झाडावर भरते पक्षांची शाळा

झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा

झाडाला लागतात सुंदर फुले

फुले तोडायला येतात मुले

झाड आहे माझा मित्र

माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र