सातारा : निसर्ग कायमच त्याच्या विविध रुपांनी आपल्याला अवाक् करत असतो. लहानसहान गोष्टींपासून ते अगदी मोठाल्या चमत्कारांपर्यंत हा निसर्ग त्याची किमया दाखवत असतो. पावसाळ्यामध्ये याच्या विविध छटा पाहायला मिळतात. सध्या असाच एक सुरेख चमत्कार पाहायला मिळत आहे साताऱ्यामध्ये.
सातारा शहरापासून अवघ्या 32 किलोमीटर दूर असणाऱ्या ठोसेघर धबधब्याची ओळख तेथील जैवविविधतेमुळेही आहे. सज्जनगड आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांची परवणी पार करत या धबधब्यापर्यंत पोहोचणं म्हणजे एक वेगळाच अनुभव. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी कायमच निसर्गाची रुपं दाखवत अनेकांना निश:ब्द केलेलं आहे.
ठोसेघर धबधब्याकडे पाहताना या स्पष्ट प्रत्यय येतो. सुरुवातीच्या टप्प्यातील पावसामुळंच हा 1200 फूट खोल दरीत कोसळणारा धबधबा आता बऱ्यापैकी प्रवाहित झालेला आहे. धरणातून निसटलेलं पाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगातून वाट काढत या धबधब्यापर्यंत पोहोचतं. इथं पर्यटकांची कायम गर्दी असते. पण, मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षीही कोरोनामुळं हे चित्र काहीसं बदललं आहे. कोरोना निर्बंधांअंतर्गत पर्यटनस्थळं बंद असली तरीही काही पर्यटक मात्र काही क्षणांसाठी या धबधब्याची एक झलक पाहण्यासाठी येण्याचंही धाडस करत आहेत.
पहिल्या पावसानं निसर्ग बहरला; निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
बाराशे फुटांवरुन कोसळणाऱ्या या धबधब्याच्या वर आणखी एक लहान धबधबा आहे. जिथं जाण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एक भुयारी मार्ग तयार केला आहे. या आक्राळविक्राळ आणि मन रोखून धरण्याच्या धबधब्यापासून पाय काढणं तसं कठीणंच. पण, परिस्थितीचं भान राखत मनावरही ताबाच ठेवावा लागत आहे.