मुंबई : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरांनी केव्हाच शंभरी ओलांडली आहे. याविरोधात आम्ही मुंबईतील गोरेगाव येथे पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन करत होतो. याठिकाणी काही जणांचे मास्क नव्हते. शिवाय थोड्याफार प्रमाणात सोशल डिस्टन्स देखील पाळण्यात आले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आमच्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आमच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलं.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत जर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असतील तर आम्ही तयार आहोत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आणि कोरोना काळात थेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना धमकावलं. त्यांच्यावर देखील तत्काळ गुन्हा दाखल करा, अशा शब्दात भाई जगताप यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. देशात पेट्रोल डिझेलचे दर राज्यस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, लडाख, महाराष्ट्र या राज्यात 100 पार गेले आहेत. तर डिझेल शंभरीच्या आसपास आहे. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दरम्यान 'एबीपी माझा'शी बोलताना भाई जगताप यांनी म्हटलं की, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मुंबईत आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या 40 दिवसांत 6 रुपयांच्या आसपास पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहिला मिळतं आहे. देशातील महाराष्ट्र, राज्यस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लडाख या ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीनी शंभरी पार केली आहे. मागील महिन्याच्या 4 तारखेपासून आपण पाहिलं तर 24 वेळा वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे. अशावेळी आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरत आहोत. अशावेळी आमच्यावर कारवाई होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. मात्र रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. किंबहूना आमची तशी मागणीच आहे.
सध्या भाजप अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. भाजप सध्या माझ्या मुलीचा लस घेतानाच फोटो व्हायरल करून तिने नियमात बसत नाही तरी देखील लस घेतली कशी? असा आरोप करत आहे. त्यांना माझं सांगणं आहे. माझ्या मुलीला कॅन्सर आहे. त्यामुळे नियमानुसार तिला लस घेण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं भाजपनं बंद करावं, असं भाई जगताप यांनी म्हटलं.
दरमान्य शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नाले सफाई न केल्यामुळे एका कंत्राटदाराला खड्डयात ढकलून त्याच्या अंगावर नाल्यातील घाण टाकली. या प्रश्नाला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले की, आमदार दिलीप लांडे यांचं कृत्य समर्थनीय नाही. त्यांच्या या कृत्याचं मुंबई काँग्रेस निषेध करत आहे. यातील आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे महापालिका 104 टक्के नालेसफाई केल्याचा दावा करत होती, मात्र आम्ही पाहणी केली त्यावेळी 30 ते 40 टक्के सफाई झाली होती. ही बाब देखील अधोरेखित करण्यासारखी आहे. कंत्राटदाराला असं वागवणं योग्य नाही. त्याला इतर देखील पर्याय होते.