वाशिम : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा सूड उगवण्यासाठी शिक्षक पतीने सहकारी शिक्षकाची हत्या केली. लोखंडी अवजार डोक्यात घालून शिक्षकाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी 'दृष्यम' सिनेमा स्टाईल मृतदेह लपवण्यात आला. वाशिममधील घटनेने खळबळ उडाली आहे.


मृत शिक्षकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शिक्षकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान इन्नू नौरंगाबादीची हत्या झाली असून, गोपाल गजाधरसिंग ठाकूर आरोपी आहे.

38 वर्षीय गोपाल ठाकूर आणि 33 वर्षीय इमरान नौरंगाबादी हे दोघंही यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणंही होतं.

25 फेब्रुवारीला इमरान नौरंगाबादी घरी परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी 26 फेब्रुवारीला दिग्रस येथील पोलिस स्टेशनमध्ये इमरान हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर सलग दोन दिवस नौरंगाबादी यांच्या नातेवाईकांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधला, परंतु तो होऊ शकला नाही.

नौरंगाबादी यांचे नातेवाईक मानोरा येथे पोहोचले, पण त्यांना आरोपीच्या घराला कुलूप लावलेलं दिसलं. शाळेत विचारणा केली असता गोपाळ सुट्टीचा अर्ज ठेवून पुण्याला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला.

28 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपी स्वत:हून मानोरा पोलिस स्टेशनला हजर झाला आणि त्याने इमरान नौरंगाबादीची लोखंडी अवजार डोक्यात मारुन हत्या केल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह ‘दृष्यम’ स्टाईलने मानोरा शेतशिवारात बांधकाम करण्यात येत असलेल्या ‘कॉलम’च्या खड्डयात पुरल्याचंही सांगितलं.

हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मानोरा पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन दिग्रस पोलिसांशी संपर्क केला आणि मृताच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं. आरोपीला घेऊन पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह खड्डयाबाहेर काढला. नातेवाईकांनी मृताची ओळख पटवली.

आरोपी गोपाल ठाकूर याच्या पत्नीचे इमरान नौरंगाबादी याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता, त्यावरुन नौरंगाबादी याची हत्या करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे. मानोरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.