मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मराठी अस्मितेवर परखडपणे बोट ठेवलं आहे. देशातील अन्य सर्व राज्यांच्या अस्मिता एकसंघ आहेत, मात्र मराठी अस्मिताच ठिगळं लागलेली असल्याचं राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं आहे.


राज ठाकरे व्यंगचित्रातून वेळोवेळी परिस्थितीवर आपलं परखड मत मांडत असतात. यावेळी राज ठाकरेंनी मराठी अस्मितेलाच लक्ष्य केलं आहे.

राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर तसंच मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे.

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट

कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा. 
#Marathi #Asmita #मराठी_राजभाषा_दिन


 



या व्यंगचित्रात परंतु, आमचीच अस्मिता फक्त ठिगळं लावलेली! या शिर्षकातून जातीपातीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

तामिळनाडूतील लोकांची तमिळ अस्मिता असते. बंगाली लोकांची बंगाली अस्मिता असते. गुजराती लोकांची गुजराती, तर पंजाबी लोकांची पंजाबी अस्मिता असते. मात्र मराठी लोकांची अस्मिता अनेक जातीपातींची ठिगळं लागलेली असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात चितारलंय.