Washim News Latest Updates : वाशिममधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्ता खराब असल्याचं कारण सांगत बाळंतीण महिलेला अर्ध्या रस्त्यात सोडले असल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.  वाशिमच्या गणेशपूरची ही घटना आहे.  रस्ता खराब असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका चालकाने अवघ्या तीन दिवसाच्या बाळंतीण महिलेला लहान चिमुरड्यासह अर्ध्या रस्त्यात सोडलं. गणेशपूर गावात घडलेल्या घटनेमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. 


वाशिमच्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर गाव रिसोडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतर असलेल गाव. या गावातील महिला उषा सावंत या महिलेला प्रसूतीसाठी 24 तारखेला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालय  इथं दाखल करण्यात आले. बाळंतपण नैसर्गिक पद्धतीने  झालं. त्यांना कन्यारत्न  प्राप्त झालं आणि 26 तारखेला डिस्चार्ज देखील मिळाला. त्यांना गावी सोडण्यासाठी सरकारी अॅम्बुलेंस देण्यात आली. मात्र या गावाला जोडणारा रस्ता खराब असल्याचं कारण सांगत 108/ 102 क्रमांकावरुन रुग्ण सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकाने सदर महिला आणि तिच्या चिमुकलीसह त्यांच्या सहकारी असलेल्या महिलेला भर रस्त्यात खाली उतरवले आणि इथून पुढचा प्रवास तुम्ही करा असं सांगितलं.


मात्र शासन नियमानुसार प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह त्यांच्या  घरी सोडण्याची जबाबदारी रुगवाहिकेच्या चालकाची आहे. याबाबत वेळोवेळी चालकाला सांगितले तसेच घरी सोडण्याची विनवणीही महिलेसह तिच्या सासऱ्यांनी केली. मात्र रस्ता खराब असल्याचं कारण सांगून चालकानं भर रस्त्यात त्यांना सोडून दिले. चालकाने तुमचे रस्ते खराब आहेत. तुम्ही आमदार, खासदार यांना बोला असं उत्तर दिल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. 


त्यानंतर अर्धा किलोमीटर पायी चालल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने महिलेला गावात नेऊन सोडले. या संतापजनक प्रकाराबद्दल वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डी बी खेडकर यांच्याशी ABP Majhaने संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, घडलेला प्रकार निंदनीय असून त्या कंत्राटदार कंपनीला पत्रव्यवहार करून त्या चालकाला काढून टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं.